इंडस्ट्री.. डिप्रेशन आणि आत्महत्या!
- Omkar Mangesh Datt
- Mar 16, 2020
- 3 min read
Updated: Mar 18, 2020
इंडस्ट्रीला आत्महत्येचा शाप काही नवीन नाही.. (इंडस्ट्रीच कशाला अगदी प्रत्येक क्षेत्रातील किंवा अगदी घरात असणाऱ्या प्रत्येक माणसालाहि हा शाप आहेच पण या लेखात सिनेमा विषयी बोलू..) गुरुदत्त पासून ते आताच्या प्रत्युशा बॅनर्जी पर्यंत कला क्षेत्रात आत्महत्येची अनेक उदाहरणं आहेत.. हे क्षेत्र जितकं सुंदर, लोभस आणि राजेशाही वाटतं तितकंच त्याच्या आत अनेक गडद छटा सुद्धा दडलेल्या असतात.. मनोरंजन क्षेत्र हे नेहमीच खूप धकाधकीच राहिलं आहे आणि आता बदलत्या कालानुरूप, वाढत्या स्पर्धेमुळे यातला स्ट्रेस दिवसागणिक वाढतोच आहे.. आजकाल मनोरंजन क्षेत्रात होणाऱ्या बहुतेक आत्महत्यांमागे हि रेस आणि त्यामुळे न मिळणारं काम हि कारणं प्रामुख्याने दिसतात..
आजकाल छोट्या पडद्यामुळे मिळणारं काम आणि त्याला मिळणारं यश हे खूप क्षणभंगुर झालं आहे.. हि मनोरंजन क्षेत्राची एक काळी बाजू आहे.. एखाद्या कलाकाराला ब्रेक मिळतो.. त्याच्या मालिकेला / सिनेमाला झटक्यात यश हि मिळून जातं.. लोक ओळखू लागतात.. पैसे येऊ लागतात.. आपल्या रुतब्याच्या हिशोबाने कलाकार आपलं राहणीमान सुधारू लागतो.. काहींच्या बाबतीत या साऱ्याचा गर्वही त्यांना होऊ लागतो.. मग अचानक एक दिवस त्यांची मालिक बंद पडते.. पुढचा काही काळ लोक त्यांना स्मरणात ठेवतात.. पण हा जमाना युज अँड थ्रोचा आहे.. अचानक कालपर्यंत आवडीचा असलेला हा चेहरा जुना होतो आणि सिनेमा आणि मालिकावाले त्याला डावलू लागतात.. मेन लीड करत असेल तर त्याचा छोट्या रोलकडे प्रवास सुरु होतो आणि एक दिवस ते मिळणं सुद्धा कमी होतं.. हळू हळू बंद होतं..
याचे अनेक परिणाम होतात.. काहींना त्या प्रसिद्धीची नशा असते.. त्यांना ती मिळेनाशी झाल्यावर ते अस्वस्थ होतात.. आपण लोकांच्या विस्मृतीत जातोय हे झेपत नाही त्यांना.. काहींच्या बाबतीत वाढवलेल्या राहणीमानामुळे त्यांचे खर्च, हफ्ते, मिळकत याचा मेळ बसत नाही आणि ते लोक निराशेच्या गर्तेत ओढले जातात.. काही हरतात.. काही खचतात.. काहींच्या प्रेम संबंधांवर त्यांच्या काम न मिळण्याचा परिणाम होतो.. हळू हळू अशी एक किंवा अनेक कारण त्या माणसाला डिप्रेशनच्या दिशेने खेचू लागतात.. आणि शेवटी एकदिवस बातमी येते.. तो गेला..
आपल्याला आवडणाऱ्या किंवा माहितीतल्या अशा अनेक कलाकारांच्या बातम्या आपण पचवल्या असतील.. या सगळ्यांना योग्य वेळी मदतीचा हात मिळाला असता.. कुणी तरी व्यक्त करायला मिळालं असतं.. तर हे लोक वाचू शकले असते का? इथे बऱ्याच लोकांचं हे हि म्हणणं असेल कि आत्महत्या करणारे भित्रे असतात.. पण असं नाहीए.. आत्महत्या करणाऱ्या प्रत्येकाची मानसिकता त्या क्षणी अशी झालेली असते कि त्याला दुसरा कुठलाच रस्ता दिसत नसतो.. ते भित्रे नसतात.. त्या क्षणाला ते एकटे असतात.. सिनेमा क्षेत्रात तर हे एकटेपण खूपच भीषण असतं.. जगासमोर हसायचं असतं.. लोकांना दाखवायचं असतं कि आपण किती खुश आणि बिझी आहोत.. पण त्यांना आतून ठाऊक असतं कि हा फक्त दिखावा आहे.. आणि हेच दिवसेंदिवस त्यांना डिप्रेशनच्या कवेत ढकलत असतं..
पण जिद्दीने लढून यातून बाहेर येणारे सुद्धा बी टाऊन मध्ये अनेक आहेत.. काही नाव वाचून तर तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल - इलियाना डिकृज, नेहा कक्कड, अनुष्का शर्मा, वरून धवन, करण जोहर अशी अनेक मेन स्ट्रीम नावं आहेत जे लोक डिप्रेशन मध्ये होते आणि त्यातून झगडून बाहेर आले आहेत.. त्यांना योग्य वेळी योग्य मदतीचा हात मिळाला म्हणून आज ते आपल्यात आहेत.. आपल्याला एंटरटेन करतायत.. जर तसं नसतं झालं तर!!!
हे सारं इथे व्यक्त करण्याचं एकच कारण आहे.. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे वरून ओके वाटत असतील पण आतून रोज डिप्रेशन त्यांना थोडं थोडं खातय.. ते हसत असतील, जोक सांगून हसवत असतील, पार्टी मध्ये नाचत असतील, फेसबुक वर आनंदी फोटो सुद्धा टाकत असतील.. पण कधीतरी नकळत त्यांच्या मनाचा एक कंगोरा कुठेतरी मोकळा होत असतो.. कुठे तरी त्याच्यतली सल व्यक्त व्हायचा प्रयत्न करत असते.. कुठेतरी ते व्यक्त होऊ पाहत असतात.. जर तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर प्लिज लक्ष द्या.. मान्य आहे आपण सगळे खूप बिझी आहोत आपल्या सगळ्यांना खूप व्याप आहेत पण डिप्रेशन आणि त्याला जोडून येणारा आत्महत्येचा विचार इतका भीषण आहे कि आपण त्या विरुद्ध काढण्यासाठी आपल्या जवळच्या प्रत्येक माणसासाठी वेळ काढलाच पाहिजे.. त्याच बरोबर आपणही आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे.. गरज पडल्यास व्यवसायिक मार्गदर्शन घेतलं पाहिजे.. शेवटी एवढंच म्हणेन, कि डिप्रेशन वय, लिंग, दिसणं, पत, व्यवसाय काहीही पाहत नाही.. आपल्या भोवती अनेक हिरोज आहेत जे रोज या डिप्रेशनशी लढतायत.. त्यांच्या सिनेमाचा शेवट गोड व्हावा हीच देवाकडे प्रार्थना!

Image Sorce: Wix
Commentaires