top of page
Search

सिनेमा आणि दुखऱ्या भावनांचा समाज..

Mar 16, 2020
3 min read

Updated: Mar 18, 2020

कला आणि राजकारण, आणि त्याहून कला आणि समाजकारण हे कधीही वेगळे नसतात.. नव्हते.. म्हणूनच पूर्वापार आपल्या देशात सिनेमांनी सामाजिक परिस्थितीवर नेहमीच भाष्य केलं आहे.. बालिका वधू, कुंकू, शेजारी, धरती के लाल, अछूत कन्या, दो बिगा जमीन, आवारा, श्री ४२०, जीस देश में गंगा बहती है, सिंहासन पासून ते अगदी राजनीती, रंग दे बसंती आणि काल पर्वा आलेल्या आर्टिकल १५ पर्यंत अनेक सिनेमांची उदाहरण आपल्या सिने इंडस्ट्री मध्ये सापडतील ज्या द्वारे कलाकार समाजाबद्दल आणि पर्यायाने देशाच्या राजकीय घडामोडीवर भाष्य करू पाहतायत.. आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा अशा सिनेमांवर भरभरून प्रेम केलंय.. पण बऱ्याचदा असंहि पाहण्यात येतं कि एखादा सामाजिक किंवा राजकीय विचारावर भाष्य करणारा सिनेमा येतो तेव्हा काही (आणि दरवेळी वेगळे) गट हे त्या सिनेमा विरोधात सरसावून उभे राहतात.. सिनेमा इंडस्ट्रीच्या इतिहासात अशा घटनांच्या बर्याच नोंदी आपल्याला आढळतील..

अनेक सिनेमांवर वेगवेगळ्या कारणाने वाद झालेले सिनेमा इंडस्ट्रीने पाहिले आहेत.. ‘आंधी’ हा १९७५ सालचा सिनेमा, यातील प्रमुख पात्राचं त्या वेळेच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्यासोबत साम्य असल्यामुळे वादात सापडाला होता.. आणीबाणीच्या काळात हा सिनेमा बॅन केला होता.. तीच गत ‘किस्सा कुरसी का’ या १९७७ सालच्या सिनेमाची सुद्धा झाली.. राजकीय सटायर असलेल्या या सिनेमाला आणीबाणीच्या काळात बॅन तर केलंच होतं पण याच्या सर्व प्रति सुद्धा सरकारने ताब्यात घेतल्या होत्या.. राज कपूर यांचा मेरा नाम जोकर हा सुंदर सिनेमा सुध्दा राजकीय वैचारिक मतभेदांमुळे ‘एका ठरावीक’ विचारसरणीच्या राजकारण्यांनी पडल्याच्या चर्चा इंडस्ट्री मध्ये आहेत.. सरकार किंवा राजकारण्यांसोबतच एखाद्या विविष्ठ वर्गाच्या किंवा जनरल काही गठ्ठा लोकांच्या भावना दुखावल्यामुळे सुद्धा बर्याच सिनेमांना फटका खावा लागल्याची उदाहरणं सुद्धा आहेत.. ‘बॅडेड क्वीन’, ‘फायर’, ‘वॉटर’ सारख्या अनेक मास्टरपिसेसनी भारतीय लोकांची भयंकर निदर्शनं पाहिली आहेत.. समाजाला मान्य नाही म्हणून समाजातल्या अनिष्ट गोष्टींवर भाष्य करणाऱ्या कित्येक सिनेमांना सो कॉल्ड सुसंस्कृत समाजाने अतिशय हीन पातळीवर निदर्शन आणि टीका करून बाद केल्याची कैक उदाहरण आहेत.. अगदी लांब का जा? पदमावत वर करणी सेनेने घेतलेला आक्षेप आजही ताजा आहे..

आपल्या संवेदना खरोखर इतक्या नाजूक झाल्या आहेत की सिनेमा सोडा, सिनेमाची गाणी सुद्धा लोकांनी सोडली नाहीत.. आजा नच ले च्या वेळी त्याच्या टायटल ट्रॅक वर जातीविषयक उल्लेखामुळे काही लोकांनी झोड उठवली होती.. बिल्लू बार्बर च्या टायटल ट्रॅकला सुद्धा अशा दुखऱ्या भावनांचा फटका बसला होता..

नाटकांनी सुद्धा अशा दुखऱ्या प्रेक्षकांचा फटका खूप सहन केला आहे.. मग ते 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकावर आलेला बॅन असो किंवा 'यदा कदाचित' सारख्या नाटका विरोधात झालेली निदर्शनं किंवा बॉम्ब हल्ले असोत.. घडलंय बिघडलय नावाच्या पॉलिटिकल सटायर असलेल्या मालिकेच्या एका भागावर रेऍक्ट होताना एका ठराविक पक्षाच्या लोकांनी झी मराठीचं अख्ख ऑफिस फोडल्याची घटना तर आम्ही स्वतः घरात अनुभवली आहे.. केदार दादाला पुढचे काही दिवस रोज धमक्यांचे फोन येत होते.. तो रोज घराबाहेर पडायचा तेव्हा बेला ताई जीव मुठीत घेऊन बसलेली असायची.. खूप भीषण परिस्थिती होती.. पुढे सगळं निवळल्यावर कळलं की केदार दादाच्या खास राजकीय मित्राच्या कार्यकर्त्याची गाडी अंतर ठेवून सतत केदार दादाच्या गाडीला फॉलो करत असायची.. काही घातपात झाला तर नडायला ते लोक तयार होते..

कलाकारांना आणि खासकरून उघडपणे व्यक्त होणाऱ्या कलाकारांना नेहमीच अशा माथेफिरू लोकांची भीती राहिलीच आहे.. आणि सोशल मीडियाच्या जमान्यात तर हे प्रस्त अधिकच वाढलं आहे.. अनुराग कश्यप सारखा दिग्दर्शक ट्विटर सोडून जातो, का तर त्याला त्याच्या परिवाराच्या सेफ्टीची चिंता वाटते, हे चित्र कुठल्याही देशासाठी भयावह आहे.. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचं राजकीय मत व्यक्त केलं की लोकांनी तिला पातळी आणि तोंड दोन्ही सोडून ट्रोल केलं.. दीपिका पादुकोण JNU मध्ये गेली तर लगेच काही लोकांनी तिच्या चित्रपटाला बॉयकॉट करायचं ठरवलं.. आज जिथे कलाकार कुठलीही उघड राजकीय भूमिका घेण्यापासून पळतात तेव्हा कलाकार व्यक्त होत नाहीत म्हणून आपण बोंब मारतो आणि जेव्हा ते व्यक्त होतात जेव्हा सुद्धा आपल्याला ते रास्त नसते ही खरोखर अतिशय गंमतीची गोष्ट आहे.. वर अशा घटनांमुळे कित्येक नवीन आणि समाजाच्या स्थाई विचारसरणीला छेद देऊ पाहणाऱ्या लेखकांना आणि दिगदर्शकांना निर्माते मिळणं सुद्धा दुरापास्त होऊन जातो.. आणि एखादा उमदा विचार गर्भातच मारला जातो..

बदलत्या काळासोबत प्रेक्षक आधीकाधिक प्रगल्भ होण्यापेक्षा ओव्हर सेन्सेटीव्ह होऊ लागले आहेत असं चित्र दिसतंय.. का सध्या स्वस्त झालेला मीडिया आणि सवंग सोशल मीडियावर मिळणारी प्रसिद्धी लोकांना अशा गोष्टी करायला लावतोय? काहीही असलं तरी एक खरं आहे, जेव्हा असा एकांगी मतप्रवाह एखाद्या सिनेमा विरोधात उभा राहतो तेव्हा त्या सिनेमाशी जोडलेल्या बर्याच जणांचं खूप नुकसान होत असतं.. काही म्हणतीलही की अशा प्रसिद्धींने सिनेमाला खुप फायदाही होतो, पण हे भाग्य फारच थोड्या सिनेमाना लाभतं..

अखेर काय, तर सिनेमा हे नेहमीच आजूबाजूच्या परिस्थितीवर व्यक्त होण्याचं माध्यम राहिलं आहे त्यामुळेच होईल तितकं सिनेमाचं राजकारण करणं टाळायला हवं.. आणि प्रत्येक व्यक्तीचा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, मतं वेगळी असू शकतात हे सगळ्यात आधी आपण स्वीकार केलं पाहिजे.. तर आणि तरच आपण वेगवेगळ्या मत प्रवाहाच्या सिनेमांना स्वीकारू शकू.. आणि तर आणि तरच आपल्याला नवनवीन विषयांवरचे अतिशय आउट ऑफ द बॉक्स सिनेमे पहायला मिळू शकतील!


Image Sorce : Google Images

 
 
 

Comments


bottom of page